Ad will apear here
Next
नेता सहकाऱ्यांना प्रेरणा देणारा हवा!
समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात सांगितलेल्या नेतृत्व आराखड्याबद्दल ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेच्या गेल्या भागात आपण पाहिले. नेता हा सहकाऱ्यांना उत्तम नेतृत्व आणि प्रेरणा देणारा असावा, असेही समर्थांनी म्हटले आहे. त्याबद्दल आजच्या भागात पाहू या...
...............
समर्थ म्हणतात, नेता हा दूरदृष्टी असणारा आणि न्याय्य वागणारा हवा. आपल्या सहकाऱ्यांचा योग्य आदर-सन्मान करणारा, नेमके बोलणारा, हलक्या कानाचा नसणारा, पण चांगला लिसनर (ऐकणारा), ऐकण्याची कला (Art of listening) अवगत असणारा, दुसऱ्यांकडे काम कसे सोपवायचे (एम्पॉवरमेंट व डेलिगेशन उत्तम प्रकारे कसे करायचे) याचे बारकावे माहिती असणारा नेता असावा. खूप मोठे यश मिळवूनही नम्र असणारा, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक व चिकित्सेने (Analysis करून) निर्णय घेऊन करणारा, नुसते घोषणा (Slogans) न देता स्वतः तसे वागून लोकांना प्रेरणा देणारा, सत्याचा आग्रह असणारा, व्यापक व संयमी स्वभावाचा नेता असणे आवश्यक असते. नेता हा अत्यंत व सर्वकाळ सावध असणारा इतरांना-सहकाऱ्यांना प्रशिक्षण-ज्ञान-अनुभव वाटणारा, धूर्त, दूरदृष्टीचा व न्याय्य बोलण्याचे- संवादाचे अनंत गुण असणारा, लोकांची मने व आत्मसन्मान सांभाळणारा व वाढविणारा, लोकांची उत्कृष्ट पारख असणारा, व्यवहारी, दक्ष आणि आर्थिक नियोजन दूरदृष्टीने व उत्तमपणे करणारा, वाद सोडविण्यात पटाईत असणारा, इतरांकडून सतत शिकणारा व विशेषतः ‘जाणत्या’ ज्ञानी/अनुभवी अशा व्यक्तीचे सहाय्य आपल्या कामासाठी व व्यवसायासाठी कसे घ्यावे याची उत्तम जाण असणारा आणि अशा तज्ज्ञ/ज्ञानी व्यक्तींकडून कष्टपूर्वक व अहंकार बाजूला ठेवून ‘शहाणपण’ शिकणारा हवा. उत्तम नेत्याचे अनंत गुण समर्थांनी दासबोधात अनेक ओव्यांमध्ये अत्यंत बारकाईने व तपशीलवार सांगितले आहेत. हा खरे तर एक मोठ्या पुस्तकाचा विषय आहे. नेता हा ‘Win Win Situation’ निर्माण करतो, इतरांना तयार करतो, नवे नेतृत्व पुढे आणतो, संघटना बांधतो, वाढवतो व आपल्यानंतरही ती कायम उत्तम वा वाढत्या यशस्वी रीतीने चालेल असे संघटन बांधतो - (Organisational develoment perpetualy of organisation). त्यातील काही गुण सांगणाऱ्या दासबोधातील निवडक ओव्या आपण आता पाहू.

दीर्घ सूचना आधी कळे। सावधपणे तर्क प्रबळे।
जाणजाणोनी निवळे। यथा योग्य।।

दूरदृष्टीचा व त्याचप्रमाणे सावधपणे योग्य पावले टाकणारा नेता.

राखो जाणे नीतिन्याय। न करी न करवी अन्याय।
कठीण प्रसंगी उपाय। करू जाणे।।      

नीतिन्यायाची चाड असणारा व कठीण प्रसंगाला न डगमगता यशस्वीपणे तोंड देणारा नेता. 

आदर, सन्मान, तारतम्य जाणे। 
प्रयोग समयो, प्रसंग जाणे। 
कार्यकारण चिन्हे जाणे। विचक्षण बोलिका।।

लोकांना सन्मान देणारा व प्रयोगशील, तसेच कार्यकारणभावाचे बारकावे समजणारा व नेमके बोलू शकणारा, सावध संवादी नेता.

दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक। सत्य, साहित्य नेमके, भेदक।
कुशळ, चपळ, चमत्कारिक। नाना प्रकारे।।

अत्यंत बुद्धिमान, धूर्त, पण न्याय तसेच कौशल्ये, नेमकेपणा व भेदकपणा असणारा, तसेच साहित्याचे अंग असणारा रसिक नेता, नाना प्रकारचे चमत्कारिक-आश्चर्यकारक गुणांचे मिश्रण असणारा नेता. ‘विवादरहित संवादी’ ज्याचा संवाद चालू असतो; पण वाद होऊ न देण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. असे नेत्याचे अनेक गुण समर्थ ठायी ठायी सांगतात.

दु:ख दुसऱ्याचे जाणावे। ऐकोन तरी वाटून घ्यावे।
बरे वाईट सोसावे। समुदायाचे।।

नेत्याला भावनिक बुद्धिमत्ता हवी व उत्तम ऐकण्याची कला अवगत हवी. भावनिक संवेदना जागृत असणारा व दुसऱ्यांचे दु:ख स्वतःहून ओळखून, काही मदत करता येणे शक्य नसेल तर निदान ऐकून तरी दु:ख वाटून घेणारा नेता हवा. ‘समुदायाचे’, लोकांचे बरे-वाईट सोसायची तयारी नाही, त्याने लीडरशिपच्या भानगडीत पडू नये, असे तर समर्थांना सुचवायचे नाही ना? 

मुख्य मनोगत राखणे। हेचि चातुर्याची लक्षणे।

लोकांची मने राखणे हे नेत्याचे शहाणपणाचे प्रधान लक्षण आहे, असे ते एका ठिकाणी म्हणतात. कोणालाही दुखवू नये, लोकांच्या ‘वर्मावर’ चुकूनही बोट ठेवू नये, तरच मोठा लोकसंग्रह होतो, मोठे नेतेपद मिळते किंवा दिग्विजय (सरसकट विजय) होतो. असे सांगताना समर्थ ‘वेड्यालासुद्धा वेडे म्हणू नये’ असे म्हणतात. पुष्कळ वेळा आपण शहाण्यालाही वेड्यात काढतो. ती ओवी अशी -

वेड्यास वेडे म्हणो नये। वर्म कदापि बोलो नये।
तरीच घडै दिग्विजय। निस्पृहासी।।

याच संदर्भात लोकांना आपण कामाच्या ओघात दुखावले नाही ना, याचे सतत क्षणाक्षणाला परीक्षण करून पुन्हा लोकांची मने सांभाळणे हा नेत्यांचा मोठा गुण या ओवीत ते सांगतात.

कोण कोण राजी राखले। कोण कोण मनी भंगले।
क्षणा क्षणा परीक्षले। पाहिजे लोक।।

‘क्षणाक्षणा’ राहिले बाजूला, आपण महिनोन्महिने, नव्हे वर्षानुवर्षे पाहत नाही, की आपल्यामुळे कोण दुखावले. राजकारण समासात ते म्हणतात -

मेळवून घ्यावे दुरील दोरे। 

जे दुखावलेत त्यांना पुन्हा आपलेसे करून घेणे, हे चतुर नेत्याचे लक्षण आहे, असे ते सांगतात. 

श्रीनिवास रायरीकर
- श्रीनिवास रायरीकर

(लेखक ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे माजी संचालक आहेत. ते दासबोधाचे अभ्यासक असून, ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ या विषयावर ते कार्यशाळा घेतात.)




(दासबोध बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSWBM
Similar Posts
समर्थांचा नेतृत्व आराखडा प्रत्येक गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने साध्य होणारी आहे. जगात अशक्य असे काही नाही. नशिबाने नव्हे तर ‘कष्टाने, ज्ञानाने, प्रयत्नाने व अचूक प्रयत्नाने माणूस यशस्वी व मोठा होतो,’ असा समर्थांचा संदेश आहे. नेतृत्वगुणाबद्दलची तत्त्वे समर्थांनी ३५० वर्षांपूर्वीच दासबोधामध्ये सांगून ठेवली आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू -
आधी केले, मग सांगितले... दासबोधातील व्यवस्थापन व नेतृत्वविषयक संकल्पनांबद्दलची प्राथमिक माहिती आपण ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेच्या पहिल्या भागात घेतली. या भागात आपण समर्थ रामदास यांच्या चरित्राचे महत्त्वाचे टप्पे आणि दासबोध या ग्रंथाच्या रचनेचा थोडक्यात परिचय करून घेऊ. ‘आधी केले व मग सांगितले’ असे त्यांनीच लिहून ठेवले
माणूस अपयशी का होतो? समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातून सांगितलेली व्यवस्थापनाची, नेतृत्वगुणविषयक, तसेच व्यक्तिविकासाची काही सूत्रे आपण ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेतून पाहिली. माणूस अपयशी का होतो याची समर्थांनी केलेली कारणमीमांसा आणि अपयश टाळण्यासाठी सांगितलेली सूत्रे, कार्यसंस्कृती आणि व्यक्तिविकासाबद्दल केलेले भाष्य
संघबांधणी कशी करावी? ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेत आपण आतापर्यंत ग्लोबलायझेशन, नेतृत्वगुण आदींसंदर्भात समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलेल्या विचारांबद्दल चिंतन केले. संघबांधणी (टीम बिल्डिंग) कशी करावी, या संदर्भात समर्थांचे विचार काय होते, हे आजच्या भागात पाहू या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language